Sunday, 25 March 2012

वाघोबांनी अडविली प्रधान वनसचिवांची वाट

 
देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 28, 2012
चंद्रपूर - सध्या वाघांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. आपली ही समस्या सांगायची तरी कुणाला आणि कशी, असा प्रश्‍न कदाचित वाघांनाही पडला असावा. मात्र, ताडोबातील वाघांनी यावर उपाय शोधला आणि चक्क प्रधान वनसचिवांचा ताफा अर्धा तास अडविला. वनसचिवांकडे जणू ते आपली कैफियतच मांडत आहेत, असे ते दृश्‍य होते. या अनोख्या भेटीने कदाचित सचिव महोदय भारावले असावे. वाघांनी तर आपले काम केले. आता वाघांच्या प्रश्‍नावर उपाययोजना करायची की नाही, याचा निर्णय सचिवांनी घ्यायचा आहे.

पुनर्वसित कुटुंबांना आर्थिक मदतीचे धनादेश देऊन परत येणाऱ्या वाहनांचा ताफा अडवून ताडोबाच्या राजाने अधिकाऱ्यांची "थेटभेट'च घेतली. अर्धा तास वाट अडवून दोन बछड्यांनी जणू रस्त्यावर ठिय्याच मांडला होता. वाघांची घटती संख्या आणि नागरी वस्तीचे अतिक्रमण, याचीच चिंता जणू हे बछडे मांडत असावेत. ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जामनी या गावाचे पुनर्वसन होत असल्याने या गावातील लाभार्थ्यांना रविवारी (ता. 26) आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यासाठी वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, अनिलकुमार सक्‍सेना, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे, ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनयकुमार सिन्हा, उपजिल्हाधिकारी ठाकरे, उपवनसंरक्षक संजय ठवरे आदी अधिकारी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांचा ताफा ताडोबाच्या दिशेने निघाला. सायंकाळी चारच्या सुमारास ताफा पांढरपौनीजवळ आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध वाघाचे दोन बछडे रस्त्यावर बसले होते. लालमातीच्या या वाटेवर ते बागडत होते. अधिकाऱ्यांचा ताफा जवळ येताच ते क्रोधित झाले. शेकडो जणांच्या उपस्थितीत ते जराही मागे सरकले नाहीत. सध्या ताडोबात रिसॉर्ट आणि मानवी वस्तीचा प्रश्‍न "आ' वासून उभा आहे. मानवी वस्ती दूर करण्यासाठी पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे; मात्र रिसॉर्टला परवानगी दिली जात असल्याने वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. याच पार्श्‍वभूमीवर या बछड्यांनी वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांची भेटच जणू घेतली असावी. सुमारे अर्धा तास त्यांनी वाट अडवली. हा क्षण टिपण्यासाठी अधिकाऱ्यांचा मोह अनावर झाला होता. अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील कॅमेरातून वाघाच्या छबी टिपल्या.

सचिवांना मुंबईला जायचे असल्याने ते घाईत होते. मात्र, त्यांच्या घाईशी वाघोबांना काही करायचे नव्हते. आधी आमचे ऐका, नंतरच पुढे जा, अशा आविर्भावात जणू वाघांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. तोपर्यंत ताडोबात सफारीला आलेल्या पर्यटकांनी दोन्ही बाजूंनी गर्दी केली. सचिव प्रवीण परदेशी यांची जिप्सी अगदी वाघांच्या समोर होती. त्यांनीही वाघांची छायाचित्रे काढली. वाघांचा हा स्वयंघोषित रास्तारोको संपल्यानंतरच परदेशींना पुढच्या प्रवासाला जाता आले.
प्रतिक्रिया
On 29/02/2012 08:57 AM Adv. khyati shah said:
ह्या व्यतिरिक्त त्यांच्या जवळ कुठला अजून पर्याय होता का? ह्यावरून तरी प्रधान वन सचिवांना कळायला हवं, त्यांनी काय करायला पाहिजे ते.
On 28/02/2012 11:11 AM Gaurishankar Patane said:
गारहाणे मांडण्या साठी रस्ता रोको हा एकच पर्याय आहे आहे कामगार संगठनाने, राजकीय पुढार्याने त्यांना शिकवले कि काय ?

No comments:

Post a Comment