Sunday, 25 March 2012

अत्यल्प खर्चात फुलविली संत्र्याची बाग

चंद्रपूर - पंचवीस वर्षांपूर्वी नऊ रुपये दराने संत्र्यांची 140 रोपे खरेदी केली. यातील 45 झाडे मेली; पण 95 झाडे आजही डौलात उभी आहेत. अत्यल्प खर्चात वरोरा तालुक्‍यातील चिनोरा येथील आनंदराव देऊळकर यांनी फुलविलेली संत्र्यांची बाग आता त्यांच्या जगण्याचे साधन झाली आहे.

आधुनिक युगात शेती परवडत नाही, म्हणून ती पडीक आणि अकृषक करून बांधकामासाठी विकली जाऊ लागली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीकडे दुर्लक्ष केले जात आहे; मात्र 25 वर्षांपूर्वी वरोरा तालुक्‍यातील चिनोरा येथील आनंदराव देऊळकर यांनी केवळ एक हजार 260 रुपये खर्चून संत्र्यांची बाग फुलविली. नऊ रुपयेप्रमाणे त्यांनी 140 रोपे खरेदी केली. यातील 95 झाडे जगली. आज ती मोठी झालीत. दरवर्षी संत्र्याचे चांगले उत्पादन होते. एक एकर शेतात लावलेल्या या बागेत गांडूळ खत आणि शेणखताच्या वापरातून फळ आणि फुलांची शेतीही फुलू लागली आहे. 25 वर्षांपूर्वी पहिल्या दोन वर्षांत पाच हजार रुपये खर्च झाले; मात्र तिसऱ्या वर्षीपासून मेहनतीला फळ मिळाले. वर्षाला दोन ते तीन लाखांचे उत्पादन होत आहे. ही संत्री नागपूर, वरोरा आणि चंद्रपूरच्या बाजारात विक्रीसाठी ते पाठवितात. झेंडू फुलांची लागवड करण्यात आली असून, उर्वरित शेतात नवीन प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे. संत्र्यांच्या दोन झाडांत दोन ते तीन फूट अंतर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मधोमध फुलांची शेती करण्यात आली. आनंदरावांकडे एकूण सात एकर शेती असून, उर्वरित सहा एकरांमध्ये चना, सोयाबीन, भाजीपाला, धान, गहू आदी पिके घेतली जातात. यातून वर्षाला लाखोंचे उत्पादन होत आहे.

No comments:

Post a Comment